

चिकणी : बंद घराला अचानक आग लागल्याची घटना चिकणी शिवारात शनिवारी २४ रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. यात घरमालकाचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
मोलमजुरी करणारे किसना पेंदोर यांच्या बंद घराला अचानक आग लागली. ही बाब बाजूच्या वंदना फुलझेले यांच्या निदर्शनास आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शंकर वाणीसह नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु, तोपर्यत घरातील साहित्याची राखरांगोळी झाली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे. या आगीत पेंदोर यांच्या घरातील इलेक्ट्रिक मीटर, मेनसह वायरिंग व बोर्ड जळून खाक झाले. या आगीत घरातील धान्य, कपडे व घरावरील लाकूडफाटा व टिनपत्रे जळाल्याने किसना पेंदोर यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.