पतसंस्थांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे शासन दरबारी मांडू : अध्यक्ष प्रशांत भोयर ; पगारदार पतसंस्था फेडरेशनची आमसभा उत्साहात

वर्धा : जिल्ह्यातील सर्व पगारदार पतसंस्थांचे प्रश्न शासन दरबारी अधिक प्रभावीपणे मांडले जातील. पतसंस्थांचा आवाज पोहोचवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वर्धा जिल्हा पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष प्रशांत भोयर यांनी केले. जलसंपदा भवन येथे झालेल्या जिल्हा पगारदार पतसंस्था फेडरेशनच्या आमसभेत ते बोलत होते. यावेळी विविध पगारदार पतसंस्थेचे पदाधिकर्यांची प्रमुख उपस्थित होती.

या सभेत पतसंस्थांना भेडसावणाऱ्या वसुलीतील अडचणी, अंशदान व ठेवीशी संबंधित प्रश्न, तसेच आयकर व गुंतवणुकीसंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री भोयर यांनी सांगितले की, पतसंस्थांचा कारभार अधिक पारदर्शक व शाश्वत करण्यासाठी फेडरेशन सतत पुढाकार घेत आहे आणि भविष्यातही ही भूमिका अधिक प्रखरपणे बजावली जाईल.

संस्थापक ओंकार धावडे यांनी मार्गदर्शन करताना फेडरेशन स्थापनेमागील उद्देश अधोरेखित केला. “सन २०११ मध्ये फेडरेशनची स्थापना झाली. पतसंस्था एकत्रित येऊन हक्कांसाठी लढा दिला, तर शासन दरबारी त्यांना गंभीरतेने घेतले जाईल,” असे ते म्हणाले.

सभेत आयकर व गुंतवणूक विषयक विशेष प्रशिक्षण वर्ग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सहकार परिषद आयोजित करून शासन दरबारी थेट संवाद साधण्याचे ठरले. सचिव नितीन कराळे यांनी वार्षिक अहवाल व ताळेबंद सादर करताना पारदर्शक कामकाजाचा आढावा दिला. “पतसंस्थांच्या विश्वासामुळेच फेडरेशन सक्षम आहे. पुढील काळात तांत्रिक सुधारणा राबवून पतसंस्था अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या आमसभेला संचालक चंद्रशेखर ठाकरे, रुपेश नागरे, दिलीप नगराळे, दिलीप उपासे, राजेश राजूरकर, सीमा मोकदम, मीनाक्षी धोपटे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेचे संचलन सोनारकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here