सेलू : आई-वडील शेतात गेल्यानंतर गावातच राहणाऱ्या आजीच्या घरी जाऊन युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
ऋतिक गरिबा तेलरांधे (१८) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे आई- वडील शेतात गेल्यानंतर तो आजीच्या घरी गेला. त्याने आजीला त्याच्या घरी पाठवून घरी कुणीही नसल्याची संधी साधून गळफास घेतला. आजी घरी परतल्यानंतर ऋतिक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. आजीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी घरासमोर गर्दी केली.
याची माहिती पोलीस पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून सेलू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. तो मोबाइल शॉपी चालवायचा. नुकताच सेलूमध्ये दुकान लावले होते. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.