
देवळी : स्थानिक औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र विद्युत निगम प्रा.ली. कंपनीत अपघात होऊन एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली असून जखमीला नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शुभम उबाळ (२२) रा. राळेगाव, असे जखमी झालेल्या अस्थायी कामगाराचे नाव आहे. या कंपनीत कोळसा व बायोमासच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. या ठिकाणी स्थायी व अस्थायी स्वरुपाचे २५० ते 3०० कामगार व कर्मचारी कार्यरत असून तीन शिफ्टमध्ये विजेचे उत्पादन केले जाते.
घटनेच्या दिवशी रात्री शुभम उबाळ कोळसा व बायोमासला वरती घेऊन जाणाऱ्या मशीनवर काम करीत होता. यादरम्यान त्याचा डावा हात मशीनच्या चेन कन्वेअर बेल्टमध्ये गेल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला जखमी अवस्थेत सावंगी रुग्णालयात नेले असता तेथे दाखल करुन न घेतल्याने त्याला नागपूरला हलविले. कंपनी प्रशासनाने कामगारांना कोणतीही सुरक्षा प्रदान केली नसल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सुद्धा या कंपनीत पाच ते सहा अपघात होऊन काहींना जीव गमवावे लागले आहे.





















































