

वर्धा : राज्य वीज नियामक आयोगाने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. याचा परिणाम विद्युत देयकांवर होत असून, विद्युत देयकात युनिटमागे किमान ५५ पैशांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील साडेतीन लाख कुटुंबीयांसह व्यावसायिकांना महावितरण विद्युत पुरवठा करते. याच विद्युत ग्राहकांना आता वीज नियामक आयोगाच्या निर्णयामुळे अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
विशेष म्हणजे पूर्वी इंधन समायोजन आकार किमान १० पैसे इतके होते, तर आता त्यात युनिटमागे किमान तब्बल ५५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. एकूणच पूर्वी १०० युनिट विजेचा वापर केल्यावर घरगुती वीज ग्राहकाला ६९० रुपये देयक अदा करावे लागत होते, तर आता शंभर युनिट विजेचा वापर केल्यास तब्बल ७४३ रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता विद्युत देयकही वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर पडणार आहे.