
वर्धा : जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह अमरावती जिल्ह्यातील तरोडा गावात पार पडणार होता. मात्र, विवाहाच्या अवघ्या १० मिनिटांआधीच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने विवाहस्थळी धाव घेत बालविवाह थांबवून गावकऱ्यांसह दोघांच्याही नातेवाइकांना समज दिली.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांना मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील तरोडा गावात होत असल्याची माहिती अमरावतीचे बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी दिली. त्यांनी तत्काळ दखल घेऊन चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होऊन तेथील पोलीस निरीक्षकांना घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेत विवाहस्थळ गाठले. यादरम्यान तेथे शुभमंगल गाथा सुरू होती. त्याचवेळी जिल्हा संरक्षण अधिकाऱ्यांनी विवाह थांबविला. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकांना बोलाविण्यात आले. त्यांना सदर विवाह हा बालविवाह असल्याने वधू, वर, त्यांचे नातेवाईक, गावकरी यांची समजूत काढली.
सदर विवाहाला स्थगिती देऊन वधू, वर, नातेवाईक यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली. त्यांना बाल कल्याण समिती, अमरावती यांच्यासमोर हजर करण्यात आले. बाल कल्याण समिती सदस्य मीना दंढले, अंजली घुलक्षे यांच्यासमक्ष वधू, वर, नातेवाईक, सरपंच, अंगणवाडी सेविका यांचा जबाब हमीपत्र लिहून घेण्यात आले. बालिकेला दर १५ दिवसांनी बाल कल्याण समितीसमक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
अमरावती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांच्या मार्गदर्शनात अजय डबले, मनीषा फुलाडी, सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन बलिकेचा बालविवाह थांबविण्यात आला असून, महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या आदेशान्वये बाल विवाह थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली.

















































