

आर्वी : मास्क न घालणार्या नागरीकांवर धडक कारवाई करते वेळी आर्वी येथील शिवाजी महाराज चौकात उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना दोन तरुणांनी मारहाण केली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आर्वी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
प्रशासनाने नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तसेच दंडात्मक कारवाई करणे देखील सुरु आहे. मंगळवार (ता.२३) मार्च रोजी शिवाजी चौकात आर्वी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्या नेतृत्वात प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत मास्क न घालणार्यांवर कारवाई केली जात होती.
कारवाई सुरू असताना दोन तरुण दुचाकी क्रमांक एमएच ३२ झेड ३४०४ वरून जात होते. मास्क न घातल्यामुळे त्यांना कारवाई पथकाने थांबविले व दंड भरण्यास दोघांना सांगण्यात आले त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता उपविभागीय अधिकारी यांनी त्या युवकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याच दरम्यान एका तरूणाने हरीश धार्मिक यांच्यावर हल्ला चढविला त्यात धार्मिक जखमी झाले.
ही माहिती मिळताच आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड आपल्या चमुसोबत घटनास्थळावर दाखल झाले. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले यातील एक तरुण अल्पवयीन असून त्याचे नाव किशोर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसर्या तरुणाचे नाव आवेश खान जाबीर खान पठाण (वय २१) असे आहे. दोघांनाही पोलिस स्टेशन येथे आणून उपविभागीय अधिकारी यांच्या तक्रारीवरुन दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ३५३ भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्वी पोलिस करीत आहे.