भीषण अपघातात दोघे जागीच गतप्राण

समुद्रपूर : जामकडून नागपूरकडे जाणारी भरधाव कार समोरील वाहनावर धडकल्याने कारमधील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जाम ते नागपूर महामार्गावर झाला. कारचा चेंदामेंदा झाला असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. अमोल नागरकर (२०) रा. मालेगाव, जि. यवतमाळ व नितीन भगत (२१) रा. कोरा असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे दोघेही एम. एच. ३१-६५७७ क्रमांकाच्या कारने जामकडून नागपूरला जात होते. भरधाव असलेल्या या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून समोरील वाहनाला जबर धडक दिली. या धडकेत कारचा चुराडा झाला असून दोघांचेही मृतदेह कारमध्ये अडकले होते. अक्षरश: कारची पत्रे कापून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस जाम, येथील सहायक पोलीस निरीक्षक भारत कराळे, सुधाकर कुमरे, नरेंद्र दिघडे व चमू तातडीने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतांना शवविच्छेदनाकरिता समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथून त्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातानंतर समोरील वाहनाने घटनास्थळावरून पळ काढल्याने वाहनाची माहिती मिळू शकली नाही. समुद्रपूर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदवून वाहनाचा शोध घेतला पण, वाहनाचा कुठेही पत्ता लागला नाही. याप्रकरणाचा पुढील तपास समुद्रपूर पोलीस स्टेशनचे सुभाष शेंडे, प्रल्हाद जाधव आणि त्यांचे सहकारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here