

वर्धा : पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होताच नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील दारूविक्रेते आणि इतर अवैध व्यावसाविकांवर धाडसत्र सुरु केले आहे. 29 ऑक्टोंबर रोजी 6 जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दारूबंदी कायदान्वये मोहिम राबवून 32 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपीकडून तब्बल 3 लाख 1 हजार 150 रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात दारूविक्रेते आणि इतर अवैध व्यावसायिक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. शहरात अनेक ठिकाणी दारूविक्री, सट्टापट्टी, जुगार आणि इतर व्यवसाय थाटले होते. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. याबाबत अनेकदा नागरिकांना तक्रारी केल्या. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत होता. ही मोहीम एकत्रितरित्या राबविल्याने ग्रामीण भागात अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.