भाजपमध्ये लोकशाहीच राहिली नाही

आयारामांना पायघड्या तर निष्ठावंतांना डावलले

पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह

चार-दोन कार्यकर्त्यांसमवेत आम्ही वर्षानुवर्षे पक्ष सांभाळला, वाढविला. राज्य, केंद्रात सत्तेचे गणित जमविण्यासाठी जिल्हाच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातही मोर्चेबांधणी केली. मात्र आता विधान परिषदेसह कोणत्याच जागेवर संधी देताना निष्ठावंतांना नेहमीप्रमाणेच डावलले जाते. उलट ज्यांनी निवडणुकांत पक्षाचे वाभाडे काढले त्यांना उमेदवारी दिली जाते. पक्षात लोकशाहीच राहिली नाही, असा नाराजीचा सूर भाजप निष्ठावंतांनी व्यक्‍त केला. नेत्यांनी याबाबत अंधारात ठेवल्याचा आरोपही अनेकांनी केला. यासंदर्भातील प्रतिक्रिया…

आयारामांना पायघड्या

भाजपमध्ये नेत्यांकडून निष्ठावंतांना गृहित धरून आयारामांना पायघड्या घातल्या जात आहेतवास्तविक पक्ष शून्यातून वाढविण्यासाठी आम्ही काम करीत आलो. पक्षवाढीसाठी आयारामांना घेणे गरजेचे होते, पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत पक्षाच्या पदाधिकारी, निष्ठावंतांना संधी देणे गरजेचे आहे. पण यावेळीही विधानपरिषदेच्या उमेदवारीत तेच घडले. ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांना शिव्या दिल्या. त्यांनाच पुन्हा संधी दिली.
माझ्यासह अनेक निष्ठावंतांनी उमेदवारीची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. प्रत्येकाने तुमचा विचार केला जाणार, असे सांगितले. पण ऐनवेळी जी नावे समोर आली त्याने उमेदवारीचे निकष स्पष्ट झाले. राज्यसभा, विधानपरिषदेवर कुठेच महिला पदाधिकार्‍यांना संधी नाही. त्यामुळे पक्षात लोकशाही नाही.
नीता केळकर, प्रदेश उपाध्यक्षा

योगदानाचा विचार झाला नाही
पक्षात इच्छुकांची मांदियाळी ही असणारच. पण पक्षात ज्या पद्धतीने मोर्चेबांधणीसाठी निष्ठावंतांनी भूमिका पार पाडल्या, त्याचा विचारही व्हायला हवा होता. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी मोर्चेबांधणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे आज भाजप बालेकिल्ला बनला आहे. यामुळे संधीसाठी दावेदारी सांगण्याची गरज नाही. आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, याची वरिष्ठांनीच दखल घ्यायला हवी होती. संधी दिली नाही तरी आम्हीआमचे काम सुरूच ठेवू.
मकरंद देशपांडे, प्रदेश सरचिटणीस

ज्येष्ठांचा विचार व्हावा
भाजप देशात क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागेवर इच्छुकांची संख्या मोठी होती. अर्थात संधी देताना निष्ठावंत व ज्येष्ठांचा विचार व्हायला हवा होता. पण पक्षश्रेष्ठींनी पक्ष बळकटीसाठी, समतोल संधी देण्याचा विचार केला असेल. त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही. योग्यवेळी योग्य संधी आपणहून चालून येतात. मूल्यमापन होतेच.
शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष

पक्षादेश मान्य; अभिनंदन
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी मजबूत काम केले. कोल्हापूर, सोलापूर जिल्हा परिषदा भाजपच्या हातून निसटल्या. पण सांगलीत सत्ता मिळवली. त्यामुळे मला पक्षाने आमदार म्हणून संधी दिली. पण केवळ 13 महिन्यांसाठी. त्यातही महापूर, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा कालावधी गेला. त्यासाठी मुदतवाढीची मागणी केली होती. पण पक्षश्रेष्ठींनी अडचणी सांगितल्या. राजकीय सोयीसाठी नव्यांना संधी दिली. त्यांचे अभिनंदन.
पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here