पोह्यांच्या पोत्याआडून प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूची तस्करी! दोघांना अटक; २० लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त

वर्धा : अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून पोह्याच्या पोत्या आडून प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी सावंगी ते दत्तपूर या बायपास रस्त्यावर असलेल्या शांतीनगर परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आली. रामनगर पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूची ६० पोती आणि ट्रक असा एकूण तब्बल २० लाखांचा तंबाखूसाठा जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. भुपेंद्र शाहू आणि विपीन शाहू असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांनी हा सुगंधीत तंबाखू छत्तीसगढ येथील रायपूर येथून नांदेडला पोहचवित असल्याची कबूली पोलिसांना दिल्याची माहिती आहे.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेची वाहतूक व विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र, काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. अशातच उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांना पोह्यांच्या पोत्याआडून प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांना दिली. गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांनी सावंगी बायपास मार्गावरील शांतीनगर परिसरात नाकाबंदी करून ट्रकला थांबवून पाहणी केली असता पोह्यांच्या पोत्या आड सुगंधीत तंबाखूची पोती मिळून आली. भुपेंद्र शाहू आणि विपीन शाहू हे सी.जी.०४ एनएच. ०६२२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये छत्तीसगढ येथील रायपुर येथून सुगंधीत तंबाखूचा माल नांदेड येथे घेवून जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात तंबाखूसाठा मिळुन आला. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक पोलीस ठाण्यात लावून कारवाई दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रीया सुरू होती.

पोलिसांनी ट्रकसह एकूण २० लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात पंकज भरणे, संदीप खरात, अजय अनंतवार, नरेंद्र पाराशर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here