

वर्धा : जलजिवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मिशनअंतर्गत जिल्ह्यातील आणखी 28 गावांच्या 18 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीत या कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक वाघ, वरिष्ठ भुवैज्ञानिक राजेश सावळे, पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अभियंता विलास काळबांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलजिवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात नियोजनपध्दतीने पाणी पुरवठ्याची कामे केली जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येकाला मुबलक आणि शुध्द पाणी मिळावे यासाठी ज्या गावांमध्ये कामे करणे आवश्यक आहे, अशा गावांचे प्रस्ताव तयार करून त्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मान्यता दिली जाते.जलजिवन मिशन अंतर्गत जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्याप्रमाणे पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहे. ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनाच नाही, अशा गावात नवीन योजना घेतल्या जात आहे. काही गावांमध्ये गरजेप्रमाणे नळजोडणीची तर काही ठिकाणी सुधारनात्मक पुनर्जोडणी, पाईपलाईन, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्थेची कामे करण्यात येणार आहे.
या कामांमधून प्रत्येक नागरीकास आवश्यकतेप्रमाणे पाणी उपलब्ध करून द्यावयाचे आहे. यापुर्वी चार टप्प्यात एकून 85 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत परिपुर्ण प्रस्ताव सादर झाल्याने आणखी 28 गावांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहे. या मंजुरीमुळे आतापर्यंत मिशनमधून एकून 113 प्रस्तावांना मान्यता झाली आहे.