हिंगणघाट : आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असल्याचा आरोप शेकापूर येथील अरविंद रामाजी मांढरे यांनी निवेदनातून केला आहे. सदर निवेदन अरविंद मांढरे यांनी पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना सादर केले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील अरविंद मांढरे यांचा मुलगा सुरज याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम होते. त्या मुलीच्या नातेवाइकांनी सुरजला जिवे मारण्याची धमकीही दिली. मृत्यूच्या पंधरा दिवसांपूर्वी सुरज हा नागपूर जिल्ह्यातील गुमगाव येथे आजीकडे गेला होता. तो 3 एप्रिलला दुपारी २.३०च्या बसने शेकापूरला आला. त्यानंतर एका ओळखीच्या घरी जाताना मित्रांना दिसला. पण घरी परतलाच नाही.
सुरजचा मोठा भाऊ आकाश याच्या मोबाइलवर त्याच दिवशी ३.3५ वाजता सुरजचा संदेश आला की, तो अरविंद डफ यांच्या विहिरीत जीव देत आहे. त्या संदेशावरून विहिरीत व विहिरीजवळ शोधाशोध केले असता काहीच आढळून आले नाही. इतरत्रही कुठे छोध लागला नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजताच्या सुमारास सुरजची पर्स व मोबाइल त्या विहिरीच्या बाजूला आढळून आले. त्यानंतर विहिरीत गळ टाकून पाहिले असता त्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे सुरजने आत्महत्या केली नसून त्याची कट रचून हत्याच झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपीला पोलिसांनी गजाआड करावे, अशी मागणीही सुरजच्या वडिलांनी केली.