

हिंगणघाट : दुकान खाली करण्याच्या कारणावरून वाद करून मारहाण करण्यात आली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या प्रकरणी एका माजी पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण तिघांना पोलिसांनी अटक करीत त्यांची ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
शनिवारी दुपारी दुकान खाली करण्याच्या विषयावरून इंद्रजित मोटवानी व संतोष ठाकूर गौतम यांच्यात फोनवर वाद झाला. यावेळी इंद्रजित वर्धेला होता. पण इंद्रजित हा परतल्यावर तो मोहता चौकातील चहाच्या दुकानात गेला असता इंद्रजित आणि संतोष ठाकूर यांच्यात हाणामारी झाली. संतोष ठाकूर गौतम त्यांचा मुलगा विक्रम व अफसरखान पठाण यांनी इंद्रजित यास बेदम मारहाण करून जखमी केले, तर विक्रम ठाकूर हे किरकोळ जखमी झाले. इंद्रजितची प्रकृती गंभीर असून नागपूर येथील रुग्णालयात त्याला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष ठाकूर गौतम (५१), विक्रम ठाकूर गौतम (१९) व अफसर खान करामत खान पठाण (६१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ७ सप्टेंबरपर्यंत पीसीआर ठोठावला.