विधानपरिषदेसाठी काँग्रेसचं सरप्राईज , दिग्गजांना बाजूला करत युवा नेते राजेश राठोड यांना संधी

बंजारा समाजाला प्रतिनिधित्व

पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून जालन्याचे युवा नेते राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती, मात्र पक्षानं त्याऐवजी एका युवा नेत्याला संधी दिली आहे.
राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत. विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात भाजपनं चार नावांची घोषणा आधीच केलेली आहे. आघाडीनं पाचचं उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध होईल, सहा उमेदवार दिल्यास मात्र मतदानाची वेळ येणार आहे काँग्रेस दुसऱ्या जागेसाठीही आग्रही आहे. त्यासाठी वाटाघाटीही चालू आहेत.
भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी तर आघाडीला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची कमतरता आहे. पण सरकार असल्यानं ही मतं आपल्या बाजूला खेचणं शक्य आहे असा दावा काँग्रेसच्या बाजूनं केला जातोय. त्यामुळे ही अधिकची जागा काँग्रेसला मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं अखेर राजेश राठोड यांच्या नावाला पसंती दिली आहे. विधानसभेवेळी काँग्रेसनं बंजारा समाजातल्या व्यक्तीला तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे यावेळी या समाजाला न्याय देण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया एका काँग्रेस नेत्यानं माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here