

वर्धा : पुलगाव येथील रहिवासी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या दिल्ली येथील दोन आरोपींना नागपूर येथील रेल्वेस्थानकावरील फलाटावरुन पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शिक्षणासाठी अँण्ड्राड मोबाईल घेऊन दिला होता. मात्र, मोबाईल हातात येताच तिने सोशल मीडियाचा वापर करणे सुरू केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख दिल्ली येथील जहागिरपुरी निवासी मोहम्मद चांद कुरैशी मोहम्मद इस्लाम कुरैशी याच्याशी झाली.
दोघांमध्येही व्हॉट्सऑपच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. सुमारे तीन महिन्यापर्यंत हा प्रकार सुरू होता. दिल्ली येथून मोहम्मद चांद कुरेशी आणि मोहम्मद सादिक मोहम्मद साबीर हे दोघे २० सप्टेंबर रोजी पुलगावात दाखल झाले.
शहरातील एका लॉजमध्ये त्यांनी खोली केली. २१ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलगी घरातून बाहेर पडली आणि दोघांनाही एका शाळेजवळ भेटली. मुलगी दोघांसोबत बसमध्ये बसून वर्ध्यापर्यंत आली. वर्ध्यातून तिघांनी नागपूरच्या बसमध्ये बसून नागपूर गाठले.
दरम्यान मुलीच्या वडिलांना संशय आल्याने पोलिसात धाव घेत याची माहिती दिली. पुलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना नागपूर येथील रेल्वे स्थानकावरून अटक करीत अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.