

तळेगाव (श्या.पंत.) : आठवडी बाजारात मुरमुरे-फुटाण्यांची विक्री केल्यावर दुचाकीने परतीचा प्रवास करीत असलेल्या छोट्या व्यावसायिकाच्या दुचाकीसमोर अचानक श्वापद आल्याने वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच दुचाकी चालक जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भिष्णूर ते राष्ट्रीय मार्गावर घडली असून शनिवारी सकाळी उघडकीस आली.
अवधूत श्रावण वऱ्हाडे (४५) रा. शिरी नांदोरा पुनर्वसन तळेगांव हे गावा-गावातील आठवडी बाजारांमध्ये जाऊन मुरमुरे-फुटाणे विक्री करतात. शुक्रवारी अवधूत हे भिष्णूर येथील आठवडी बाजार आटोपल्यावर एमएच 3२ एएम ५९०१ क्रमांकाच्या दुचाकीने परतीचा प्रवास करीत असताना अचानक दुचाकीसमोर श्वापद आले. अशातच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन तसेच वाहनचालक रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत फेकल्या गेले. यात अवधूत यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याच मार्गाने जाणाऱ्या व्यक्तींना दुचाकी बेवारस स्थितीत पडून असल्याचे दिसले. बारकाईने पाहणी केली असता धक्कादायक प्रकार पुढे आला, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात राजू साहू, अमोल इंगोले करीत आहेत.