लता मंगेशकर यांचं निधन; केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मुंबई : ‘थांबला असला श्वास तरी सूर राहील सदा सोबतीला…’ जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढ्यांना गाणं म्हणजे काय हे कळलं. संगीत विश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वाराचं देणं’ मानत वंदन करतात अशा भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना- मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी- ज्या प्रमाणात आनंद दिला आहे, तितका आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतिहासात कुठल्याही इतर कलाकाराने दिलेला नाही. लता मंगेशकर यांच्या निधानानंतर आता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. मुंबईतील दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमित त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

लता मंगेशकर यांना ९ जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर ३० जानेवाराली लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here