
सायली आदमने
वर्धा : कोविड १९ चा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत, प्राणवायूच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात मृतकांच्या संख्या जास्त प्रमाणात दिसून येत आहे.यावेळी वर्धा विधानसभा क्षेत्रातील आमदार डॉ पंकज भोयर बेपत्ता झाले असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिली.
कोरोना आजाराचे रुग्ण वाढत आहेत, सावंगी व सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांकरिता खाटा उपलब्ध होत नाही. त्याच बरोबर प्राणवायूच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वर्धेचे खा.रामदास तडस, जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार व उर्जा मंत्री नितीन राऊत रुग्णांना वेळेत उपचार मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे.
भुगाव येथील कंपनी मध्ये १५०० खाटांचे जम्बो रुग्णालय उभारण्यात यावे यासाठी बैठका घेतल्या जात आहे. तर प्राणवायूच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव जाता कामा नयेत व रुग्णांना रेमडीसिवर इंजेक्शन उपलब्ध व्हावे याकरिता गडकरी यांनी विशाखापट्टणम वरुन प्राणवायू तर रेमडीसीवर इंजेक्शन बनविण्यासाठी वर्ध्यात परवानगी दिली आहे.
त्याच बरोबर खासदार रामदास तडस देवळी येथून मिळणाऱ्या प्राणवायू कंपनीला भेट, १५०० खाटांचे जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी भेट व कोरोनाच्या बिकट परिस्थिती मध्ये गावोगावी जाऊन रुग्णांची काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आर्वी मतदार संघाचे आमदार दादाराव केचे व आमदार समीर कुणावार हे दोघेही कोरोना काळात सक्रिय असल्याचे दिसून येत आहेत.
मात्र वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ पंकज भोयर मागील वर्षी व या वर्षी सुद्धा विधानसभा क्षेत्रात दिसून आले नाही. कुठल्याही कोविड सेंटरला भेट दिली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक रुग्णांचा या महामारीत मृत्यू होत असतांना आमदार कुठे आहे हे कुणालाही माहिती नसल्याचे सांगितले जात असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी चक्क भोयर बेपत्ता झाले असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना दिली आहे.


















































