अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक! दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

वर्धा : वडकीकडून हिंगणघाटच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीला भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच आरोपी वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. चंद्रशेखर भोलाराम कुबडे (६२) रा. सावली (वाघ) असे मृतकाचे नाव असून या अपघाताची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे.

सावली (वाघ) येथील चंद्रशेखर कुबडे हे एम. एच. 3२ ए. एल. २४५९ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर हैदराबाद मार्गाने यवतमाळ जिल्ह्यातील वडकीकडून वर्धा जिल्ह्यातील हिगणघाटच्या दिशेने येत होते. दुचाकी पोहणा शिवारात आली असता भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकी चालक चंद्रशेखर कुबडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे दिलीप घोटे, देवेंद्र पुरी, किशोर येळणे, गौरव खरवडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. शिवाय अपघाताची माहिती वडनेर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या वडनेर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here