बँकेच्या आवारातून ६० हजार रोख पळविणारे जेरबंद

वर्धा : वर्धा शहरातील मागनवाडी भागात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या आवारात पासबुक प्रिंटिंगसाठी रांगेत लागलेल्या व्यक्‍तीच्या कापडी बॅगमधून तब्बल ६० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याच प्रकरणातील दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. हे दोन्ही आरोपी उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून बाबूलाल कस्तुरीलाल अग्रवाल (६६) व अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (५८), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नरेंद्र शिवभोजन मिश्रा, रा. भामटीपुरा वर्धा हे ०५ जुलैला भारतीय स्टेट बॅकेत पासबुक प्रिंट करण्यासाठी रांगेत उभे होते. दरम्यान, मोठ्या हुशारीने अज्ञात चोरट्यांनी नरेंद्र यांच्या जवळ असलेल्या कापडी बॅगेतील ६० हजारांची रोकड लंपास केली. ही बाब लक्षात येताच नरेंद्र यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनीही गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान, खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी बाबूलाल व अब्दुल याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरीची 3० हजारांची रक्‍कम हस्तगत केली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात राजेश राठोड, अनुप राऊत, अरविंद घुगे, विकास मुंडे, दिनेश राठोड यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here