चिखलात झोपून ‘प्रहार’ ने वेधले प्रशासनाचे लक्ष! लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेबाबत रोष; आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र

आर्वी : शहरात सुरू असलेल्या भूमिगतच्या कामामुळे नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्याचे खस्ताहाल झाले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींची निष्क्रियता आणि प्रशासनाने घेतलेल्या झोपेच्या सोंगाला नागरिक कंटाळले असून, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेचे बाळा जगताप यांनी कार्यकर्त्यांसह न.प. समोरील रस्त्यावर असलेल्या चिखलात झोपून अनोखे आंदोलन केले.

रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे निवेदन यावेळी न.प. मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरात भूमिगतची कामे सुरू आहेत. मात्र, या कामात अनियमितता असल्याने अवागमन करणाऱ्यांची चांगलीच फजिती होत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असून, अपुऱ्या कामामुळे पावसाच्या पाण्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. थोडा जरी पाऊस आला की, पूर्ण रस्ते चिखलात माखतात. यामुळे वेळीच ही समस्या दूर न केल्यास आर्वीकरांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची हक्‍यता आहे.

याबाबत अनेकदा निवेदनं, आंदोलने करूनही लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत असून न.प. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाळा जगताप यांनी कार्यकर्त्यांसह नगरपालिकेसमोरील रस्त्यावर चिखलात झोपून या मागण्यांसाठी आंदोलन केले. जर न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र असेल, असा इशारा न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here