

समुद्रपूर : समुद्रपूर ते हिंगणघाट अशा नियमित प्रवासी फेऱ्या करणाऱ्या मिनीडोअर चालकाचा स्टेअरिंग सीटवरच मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ नागरिकांच्या सतर्कतेने १६ मे रोजी ही घटना उघडकीस आली. योगेश उर्फ बाल्या उमेश पराते (३४) असे मृतकाचे नाव आहे.
योगेश हा (एमएच ३२, बी ८३३२) क्रमांकाच्या प्रवासी वाहनावर चालक म्हणून काम करायचा. हे वाहन आकाश बोरले यांच्या मालकीचे होते. मृतक योगेश हा निराधार होता. त्याला घरदार नसल्याने तो कुठेही झोपायचा. १६ रोजी समुद्रपूर येथील आठवडी बाजार असल्याने तो हिंगणघाट ते समुद्रपूर फेऱ्या मारत असताना त्याने मालवाहू वाहन दुपारी ४ वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील आंबेडकर पुतळ्याजवळील साई टायर्स वर्कच्या बाजूला रस्त्याकडेला उभे केले, उन्हामुळे त्याला अस्वस्थ वाटत असल्याने स्टेअरिंगवर डोके ठेवून तो झोपला. काही नागरिकांना चालक स्टेअरिंगवर झोपलेला दिसला. मात्र, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही युवकांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता, चालक योगेश हा मृतावस्थेत निपचित पडून असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, सागर पाचोडे यांनी घटनास्थळी भेट दिली, यानंतर पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पुढील तपास पोलीस करीत आहेत.