१६ नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळणार ११.६७ लाखांची शासकीय मदत! जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यांकडे निधी वर्ग; वीज पडल्याने झाले होते मोठे नुकसान

वर्धा : मध्यंतरी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तब्बल १५ जनावरे तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. वारसदारांना व पशुपालकांसाठी ११ लाख ६७ हजारांची शासकीय मदत मंजूर झाली असून, ती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेला हा जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळणार आहे.

सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

वर्धा तालुक्यात वीज पडून एका जनावराचा, सेलू तालुक्यात तीन, देवळी व आर्वी तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात चार, तर समुद्रपूर तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला. या सर्व पशुपालकांना शासकीय मदत मिळावी म्हणून पाठविण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ३६ लाख ७ हजारांचा निधीही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा सर्व निधी जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय आर्थिक मदत मिळणार आहे. हवालदिल कुटुंबियांसाठी शासनाची ही मदत मनोधैर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचीच ठरणार आहे.

त्या जखमीच्या प्रस्तावावर वेळीच होणार विचार

वीज पडल्याने कारंजा तालुक्यातील दानापूर येथील विश्वेश्वर आनंद काळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद महसूल विभागाने घेतली असून जखमी काळे यांना शासकीय मदत देण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. आवश्यक कार्यवाही केल्यानंतरच या कुटुंबाला शासकीय मदत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here