
संजय धोंगडे
सेलू : सरकार सोबत करार केल्यानुसार कव्हरेज देणे बंधनकारक असताना मोबाईल कंपन्यांच्या दुर्लक्षित पणामुळे तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक मोबाईलचे कव्हरेज गुल होत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आजच्या काळात मोबाईल ही अतिआवश्यक वस्तू ठरत असून मोबाईलशिवाय राहावल्या जात नाही. मोबाईलमुळे जग अगदी जवळ आले आहे. परंतु, कमी जास्त कव्हरेजमुळे ग्रामीण भागातील ग्राहक मात्र त्रस्त झाले आहे. सध्या शाळा कॉलेज बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. परंतु, क्षीण कव्हरेज मुळे शिक्षणातही व्यत्येय येत आहे. सुरवातीच्या काळात फुल कव्हरेज असताना नंतर मात्र या कव्हरेज मध्ये क्षिणता येणे हा संशोधनाचा विषय ठरत आहे. मोबाईल कंपन्या खर्च कमी करण्यासाठी कव्हरेज कमी करीत असल्याचे जाणवत असून यामुळे मात्र ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व बाबीवर सरकारी नियंत्रण असते परंतु तक्रारी नंतरही सुधारणा होताना दिसत नाही.
मी वडगाव(खुर्द) येथील सरपंच असून माझ्या गावात जिओ या कंपनीचे शेकडो ग्राहक आहे. सुरवातीला या कंपनीचे चांगले कव्हरेज असल्यामुळे अनेकांनी या कंपनीची सेवा घेतली परंतु गेल्या दोन महिन्यापासून कव्हरेज गुल झाले आहे. ऑनलाइन शिक्षण घेणारे विध्यार्थी खूप त्रस्त झाले आहे, याबाबत मी जिओ कंपनीकडे तक्रार सुद्धा दाखल केली परंतु कव्हरेज मध्ये सुधारणा झाली नाही.
माला नरताम, सरपंच ग्रामपंचायत वडगाव (खुर्द)

















































