रिधोरा धरणावर तरुण, तरुणी व कुटुंबाची तोबा गर्दी! धरणाला आले पर्यटन स्थळाचे स्वरुप

संजय धोंगडे

सेलू : तालुक्यातील रिधोरा गावालगत पंचधारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या धरणावर लोंकाची चांगलीच गर्दी उसळली आहे. सेलू १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रिधोरा-पंचधारा धरण बघण्यासाठी तालुक्यातील व वर्धेकराची अफाट गर्दी होत आहे. लॉकडाऊन असूनही धरण पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने तेथे कोविड १९ नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.
कोरोना सारख्या महामारीने शासनाच्या नाकात दम आला असून हा आजार नियंत्रणात शासन जंग जंग पछाडत असतांना लोकांना याचे काही देणेघेणे नाही अशीच प्रचिती येत आहे. अगदी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी धरण पाहण्यास आलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्यावेळी सेलू पोलिसांनी धरणाच्या आजूबाजूला कठडे उभारून धरण परिसरात लोकांना जाण्यास मज्जाव केला होता.
आता त्याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होताच तेथे हौसे, गौसे, नौसे यांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. ते ठिकाण प्रशासनाच्या नियंत्रणात आहे की नाही, याबाबत संशयच आहे. पोलीस प्रशासन व कोरोना अंतर्गत येत असलेल्या शासकीय यंत्रणांनी त्वरित याबाबत कडक बंदोबस्त करणे गरजेचे आहे अन्यथा अनुचित घटना टाळता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here