


पवनार : दलित साहित्याचे महानायक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त पवनार येथे १ ऑगस्ट रोजी क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे बहुउद्देशीय संस्था, पवनार यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा संगम असलेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. डॉ. पंकज भोयर (पालकमंत्री, वर्धा जिल्हा) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतभाऊ मोढाव (सरचिटणीस, काँग्रेस कमिटी वर्धा) असतील, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनेश काळे (संचालक, फिनिक्स अकॅडमी) उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९ वाजता ध्वजारोहणानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी व्याख्यान प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोंब्रागडे (सेवानिवृत्त इतिहास विभाग प्रमुख यशवंत कॉलेज वर्धा) यांचे होणार आहे. कार्यक्रमाच्या सायंकाळच्या सत्रात ५ वाजता भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले असून, पवनार ग्रामस्थ, विद्यार्थी, आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. कार्यक्रमात वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पावडे, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पुरुषोत्तम टोपणे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.