आष्टी : जंगली श्वापदांसाठी शेतात पेरुन ठेवलेले गावठी बॉम्ब हातात पकडल्याने त्याचा स्फोट झाला. यात शेतकरी गंभीररित्या जखमी झाला असून उपचाराकरिता अमरावतीला हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खडकी शिवारात घडली. प्रकाश घारड़ (६०) रा. खडकी, असे जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. ते मंगळवारी दुपारी शेतात गेले असता जोताच्या बांधावर त्यांना खडडे खोदून त्यात काही गोळे ठेवल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी एका खडडयातील जोळा हातात पकडताच भयानक स्फोट झाला. यात प्रकाशन घारड यांचा डावा हात पूर्णत: निकामी झाला. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता अमरावती येथे हलविण्यात आले. या परिसरात काही शिकारी फिरत असून जंगली श्वापदांच्या शिकारीकरिता शेतकऱ्यांच्या शेतात गावठी बॉम्ब पेरुन ठेवत असल्याचा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे बॉम्ब आता शेतकण्यांसाठी जीवघेणे ठरत असून याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी होत आहे.