


पवनार : “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित, वंचित समाजासाठी शब्दांची क्रांती उभी केली. त्यांच्या विचारांचा वसा आजही समाज परिवर्तनासाठी प्रभावी ठरतो. त्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. पवनार येथे क्रांतीगुरु वस्ताद लहूजी साळवे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे, माजी सरपंच अजय गांडोळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, ग्रामविकास अधिकारी आदिनाथ डमाळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन कवाडे, विशाल नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
डॉ. भोयर लहुजी साळवे संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत, पुढे बोलताना म्हणाले संस्था सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात अग्रस्थानी असून, अण्णाभाऊंच्या विचारांना जिवंत ठेवणारी ही कृती म्हणजेच खरी मानवसेवा आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व पुतळ्यासाठी माझ्या आमदार निधीतून निधी दिला आहे. तसेच पवनार ग्रामस्थांनी उत्कृष्ट कामगिरी करून हा उपक्रम यशस्वी केला आहे. लवकरच अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अभ्यासिका आणि वाचनालयांची निर्मितीही केली जाईल, असेही डॉ. भोयर यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे म्हणाले की अण्णाभाऊंच्या साहित्यात गोरगरीब कष्टकरी समाजाचं वास्तव उमटतं. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा अन्यायाविरुद्धचा आवाज आहे. त्यांनी लिहिलेली कादंबरी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली, आणि त्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पारितोषिक मिळालं हे त्यांचं प्रभावी लेखनशक्तीचं उदाहरण आहे,” असे ते म्हणाले. बालपणापासून, शाळा-महाविद्यालयातून आणि समाजातून जे संस्कार मिळतात तेच आयुष्याची दिशा ठरवतात. यशस्वी होण्यासाठी भावनेपेक्षा विवेकाची गरज अधिक आहे. त्यामुळे जे जे शिकतो, अनुभवतो, ते जपून ठेवा. आयुष्याचं खरं वैभव हे संस्कारांत असतं,” असा त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला.
यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत धोंगडे, वस्ताद लहुजी साळवे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोविंद वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते चंदू वाघमारे, सतीश अवचट, नारायण पेटकर, बालू गवळी, भैय्याजी मुंगले, विजय बेंडे, शेखर लोखंडे, अशोक लोखंडे, अनिल मुंगले, प्रफुल मुंगले अजय जाधव, संदीप पडघान, क्रिश मुंगले, राणीबाई धाकतोड, डॉली मुंगले, विजय बेंन्डे, मंगेश वानखेडे, विठ्ठल पडघान, अमोल गवळी निलेश मुंगले, भुषण मुंगले, अजय जाधव, बबलू पडघान, रोशन मुंगले, प्रदिप आमटे, स्वप्निल मुंगले, हना जाधव, मुंगले, गोलू गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.