


देवळी : खते आणि कृषी निविष्टांच्या वितरणात होत असलेल्या अनियमितता, साठ्याचे गैरवर्तन, शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणी आणि लिंकिंगच्या नावाखाली जबरदस्तीच्या विक्रीच्या तक्रारींना आता आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील काही निविष्टा विक्रेत्यांनी मागील वर्षीचा खत साठा पौज मशीनवरून नियमितरीत्या कमी न केल्यामुळे तालुक्यात खते उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. युरिया खताचा साठा असूनही काही दुकानदार शेतकऱ्यांना ते नाकारत असल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.
तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रशांत भोयर यांच्या नेतृत्वाखाली विविध दुकानांची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीत काही दुकानदार खत विक्री करताना शेतकऱ्यांना अन्य निविष्टांची लिंकिंगद्वारे जबरदस्ती विक्री करत असल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर काही विक्रेत्यांना परवाना रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर एका विक्रेत्याविरुद्ध प्रस्तावित कार्यवाही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचदरम्यान, ज्या विक्रेत्यांकडे A-2 प्रमाणपत्र नसतानाही जैव उत्प्रेरकांची विक्री चालू होती, त्यांच्यावर तत्काळ विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
विक्रेत्यांकडून तक्रारी, पण दोष झाकण्यासाठी?
दुसरीकडे, काही विक्रेत्यांनीही अडचणी व्यक्त केल्या आहेत. काही शेतकरी खते विकत घेताना गरजेपेक्षा अधिक मागणी करत असून, नकार दिल्यास खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. याशिवाय काही दुकानदारांना पौज मशीन उशिरा मिळाल्यामुळे साठा ऑनलाईन कमी करण्यात अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे काही नामांकित कंपन्या – त्यात काही सरकारी उपक्रम चालवणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे – विक्रेत्यांवर जबरदस्तीने विशिष्ट निविष्टा लिंकिंग पद्धतीने देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप दुकानांमार्फत खाजगीत करण्यात आला आहे. छोट्या विक्रेत्यांना त्रास देण्याऐवजी अशा कंपन्यांवरच उच्चस्तरावरून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आता व्यक्त होऊ लागली आहे.
कठोर कारवाईचा इशारा…
गुणवत्ता निरीक्षक प्रशांत भोयर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या किंवा गैरप्रकार करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला पाठीशी घातले जाणार नाही. अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आणि खते नियंत्रण व वाहतूक आदेश यानुसार दोषी विक्रेत्यांविरोधात कठोर कार्यवाही केली जाईल.