


वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने केळझर येथे गांजाची विक्री करणाऱ्या बाप-लेकाविरोधात कारवाई केली. या कारवाईत १.१५३ किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकाला अटक व दुसरा फरार आहे.
पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १ ऑगस्ट रोजी सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, त्यांना केळझर येथे गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, केळझर येथील वॉर्ड क्र. १ मध्ये शासकीय विश्रामगृहासमोर राहणाऱ्या किसनसिंग शेरसिंग उर्फ छोटूसिंग बावरी (वय ५३) यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. घराची झडती घेतली असता, एका पिशवीतील पन्नीमध्ये सुमारे १.१५३ किलो वजनाचा गांजा आढळून आला. गांजाची किंमत सुमारे २३ हजार ६० रुपये इतकी असून, हा अंमली पदार्थ त्याला त्याचा मुलगा भोलासिंग किसनसिंग बावरी याने पुरवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
बाप-लेक संगनमताने गांजाची विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले असून, किसनसिंगला अटक करण्यात आली आहे, तर मुलगा भोलासिंग सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पो.उपनिरीक्षक उमाकांत राठोड, पो.अं. अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, राहुल लुटे, मुकेश ढोके यांचा समावेश होता.