बसचालक-वाहकाचा विद्यार्थिनींवर धक्काबुक्कीचा प्रकार ; पवनार बसस्थानकात घटनेनंतर संतापाची लाट ! विद्यार्थ्यांकडून पोलिसात तक्रार

पवनार : नागपूर आगाराची बस (क्रमांक एमएच-४०-वाई-५१२७) पवनार बसस्थानकावर थांबली असता चालक व वाहकाने शालेय विद्यार्थिनींना बसमधून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार (ता. ६) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडला. यात एका विद्यार्थिनीच्या हाताला जखम झाली, तर दुसरी विद्यार्थिनी खाली पडल्याने किरकोळ जखमी झाली. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, सामाजिक कार्यकर्ते विशाल नगराळे यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत तातडीने वर्धा आगार प्रमुखालय व पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली आहे.

पवनार परिसरातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी पवनार बसस्थानकावर थांबले होते. नागपूर आगाराची वरील बस पवनार थांब्याजवळ आली असता विद्यार्थिनींनी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. काही मुली बसमध्ये चढल्यानंतर चालकाने बस सुरू केली आणि अचानक बस थांबवून खाली उतरला आणि बसमध्ये चढलेल्या काही मुलींना खाली उतरवून ढकलण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत एका मुलीच्या हाताला दुखापत झाली, तर दुसरी मुलगी खाली पडली. या अनाकलनीय वर्तनामुळे प्रवाशांतही संताप व्यक्त झाला. घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी थेट वर्धा आगार प्रमुखालयात धाव घेत लेखी तक्रार दिली. तसेच वर्धा पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित चालक-वाहकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

प्रवाशांचा आरोप…

स्थानिकांचा आरोप आहे की, एस.टी. बस चालक-वाहकांकडून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांबाबत निष्काळजी वर्तन केले जाते. शालेय मुलांना बसमध्ये न घेणे, बस न थांबवणे किंवा मधल्या रस्त्यावर उतरवणे असे प्रकार वेळोवेळी घडत असतात. यावर एस.टी. प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया…

शालेय मुलींच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्यांना आम्ही कधीही सोडणार नाही. अशा प्रवृत्तीच्या चालक-वाहकांवर तातडीने निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करू. विद्यार्थिनींना रस्त्यावर ढकलणे ही फक्त निष्काळजीपणा नव्हे, तर गुन्हेगारी मानसिकतेची पातळी आहे. हा प्रकार वारंवार घडतोय, म्हणूनच आम्ही थेट पोलिसात गेलो.

विशाल नगराळे, सामाजिक कार्यकर्ता पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here