

वर्धा : वर्धा शहरासह जिल्ह्यात बनावट नंबरप्लेट लावून गुन्हे करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतूक पोलिसांना हेल्मेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स तपासून दंड आकारण्याबरोबरच आता बनावट नंबरप्लेट लावून गुन्हेगारी करणाऱ्यांवरही करडी नजर ठेवावी लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात बोगस नंबरप्लेट वापरून शेकडो वाहने धावत आहेत. चोरटे वाहनचोरी केल्यानंतर त्याची मूळ नंबर प्लेट फेकून देतात. त्यावर बोगस अथवा अन्य वाहनांचा नंबर टाकतात. ओळखीचे मॅकेनिक किंवा नातेवाइकांच्या माध्यमातून अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विक्री करतात. ती चोरीची वाहने शहरात बिनधास्त धावतात. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांच्या संख्या अधिक आहे. विशेषत: पल्सर गाडीच्या चोरीमध्ये वाढ झाली असून याचा वापर सोनसाखळी चोर आणि लूटमार करणारे आरोपी करतात.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावून तसेच लूटमारीच्या घटना घडल्या असून, यामध्ये दुचाकीचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. अनेक ठिकाणी पोलिसांना गुन्ह्यात चोरीच्या दुचाकीचा वापर झाल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यामुळे बोगस नंबरप्लेट पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.