अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेची अटक ; चार घरफोड्यांचा उलगडा ! १ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल जप्त

वर्धा : स्नेहलनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी अट्टल घरफोड्या करणाऱ्या एका आरोपीस अटक करून चार घरफोड्यांचा उलगडा केला असून एक लाख एक्याण्णव हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्नेहलनगर परिसरात वारंवार होणाऱ्या चोरी व घरफोडीच्या घटनांमुळे तेथील नागरिकांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करून समांतर तपास सुरू केला. या पथकांनी स्नेहलनगर परिसरासह सेवाग्राम आणि अमरावती रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून संशयित आरोपीचा मागोवा घेतला. तपासादरम्यान हे समोर आले की, संशयित आरोपी यापूर्वी वर्धा, नागपूर, भंडारा आणि इतर जिल्ह्यांतील घरफोडी प्रकरणांमध्ये अटक झालेला आहे.

दरम्यान, दि. १० ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना आरोपी रेल्वे स्टेशन बडनेरा परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दोन्ही पथके तत्काळ बडनेरा येथे रवाना झाली. शोधमोहीमेदरम्यान एक संशयित व्यक्ती रेल्वे स्टेशन परिसरात फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने स्वतःचे नाव ओमप्रकाश रंगनाथ खांडवे (वय ३५, रा. तुलसी नगर, बुलढाणा) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने वर्धा शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या व मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून पोलिसांनी दोन लॅपटॉप, सात मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल असा एकूण १ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईचा पुढील तपास वर्धा शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन आणि अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पो.उ.नि. सलाम कुरेशी, अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, दिनेश बोथकर, विकास मुंढे, सुगम चोधरी, शुभम राऊत, अरविंद इंगोले, सुमेध शेंद्रे, राहुल अथवाल, जगदीश डफ व आशिष उमरकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here