


वर्धा : आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण, पाणी व्यवस्थापन आणि कचऱ्याची समस्या… विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात असूनही या सर्व समस्या सुटल्या नाहीत, उलट अधिक गंभीर स्वरूप घेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे राज्यकर्त्यांकडे या प्रश्नांचे आकलन आणि योग्य नियोजन करण्याची सम्यकता नाही, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले.
ते पडेगाव येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात आयोजित वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार सादरीकरण” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. कोरडे सर, मा. गवारकर मॅडम आणि रजनी सुरकार उपस्थित होते. सुरकार म्हणाले, भारतात दरवर्षी सरासरी १४०० सेंमी पावसाचे पाणी पडते, पण योग्य नियोजनाअभावी ते समुद्रात वाहून जाते. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते, भूस्खलन होऊन मृत्यूही होतात, तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागात लोक तहानलेले राहतात. पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत मुरवण्यासाठी वैज्ञानिक नियोजनाची गरज आहे, पण सरकारकडे त्या दिशेने धोरणच नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, आरोग्य सेवेची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णालये आहेत पण डॉक्टर नाहीत; डॉक्टर आहेत पण औषधे किंवा यंत्रे नाहीत. त्यामुळे बालमृत्यू, कुपोषण, अपघात आणि मातामृत्यू वाढले आहेत. शिक्षण क्षेत्रातही मराठी शाळा बंद होत आहेत, गरीब-शेतकरी वर्गासाठी शिक्षण हे स्वप्न बनले आहे. बेरोजगारी सतत वाढत असून शासनाकडे यावर रामबाण उपाय नाही.”
सुरकार यांनी यावेळी “बुवाबाजी”वर घणाघाती प्रहार केला. अनेक पुरोगामी संत व विचारवंतांचे विचार मांडत त्यांनी चमत्कारांच्या मागे असलेली हातचलाखी विद्यार्थ्यांसमोर सप्रमाण सादर केली. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव समजून घेणे; कारण समजले की ते बदलविण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. पण कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, तर आरोग्य-शिक्षणासाठी निधी अपुरा पडतो. यालाच आपण चुकीच्या धोरणांचे फलित म्हणू शकतो, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. कोरडे सर यांनी केले, सूत्रसंचालन मा. गवारकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन रजनी सुरकार यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.