समाधान ‘हेल्पलाइन’चा दिलासा! कार्यालयीन अडचणींचा होतोय झटपट निपटारा; जिल्ह्यातील १९४ पोलिसांच्या समस्यांचे पोलीस अधीक्षकांकडून झाले ‘समाधान’

वर्धा : पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन अडचणी सोडविण्यासाठी पोलीस विभागाने ‘समाधान’ हेल्पलाइन सुरू केली आहे. सेवानिवृत्त व सेवेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन समस्या सोडविण्यासाठी या हेल्पलाइनचा उपयोग केला जात आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १९४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या, अडचणी हेल्पलाइनवर नोंदविल्या असून, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी त्यांच्या अडचणी, समस्यांचे निराकरण करून त्यांचे ‘समाधान’ केले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘समाधान’ या शीर्षकाखाली पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी नोंदविण्यात येत आहेत. ७७७५००२७५० या हेल्पलाइनच्या माध्यमातून अर्जित रजा, वैद्यकीय रजा, पेन्शन, घरभाडे भत्ता मंजुरी, वैद्यकीय बिले, वेतननिश्चिती, वेतनवाढ, कसुरी, बक्षिसे, शीट रिमार्क, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी, पदोन्नती, बदली वगैरे या विषयांबाबत समस्या, तक्रारी दाखल करून घेतल्या जातात.

या कक्षातील पोलीस निरीक्षक राजेश कडू यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस तारा ताकसांडे या समस्यांची नोंद घेऊन त्यांच्या समस्या निवारण करण्यास प्राधान्य देत पोलीस निरीक्षकां (कल्याण) मार्फत त्यांच्या तक्रारींशी संबंधित पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांची वेळ घेऊन भेटण्यास सांगतात.

पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल १९४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे समाधान केले आहे. या उपक्रमामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येत असून झटपट निपटारा होत असल्याने दिलासा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here