

वर्धा : दरोडा टाकून एकाची हत्या तर तिघांना जखमी करणाऱ्या आरोपी कवडू यादवराव कदम (रा. वायगाव) याला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-३ आर. एम. मिश्रा यांनी दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
मृतक वल्लभ भुतडा हा शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा. तर आरोपी कवडू हा त्याच्याच गावातील असल्याने त्याला मृतकाविषयीची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे कवडू याने वल्लभ यांच्या घरातील ऐवज लुटण्याच्या उद्देशाने १३ डिसेंबर २०१२ ला मध्यरात्री २.३० वाजता घराचे दार तोडून आत प्रवेश केला.
आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने कुदळ व चाकूचा वापर करून वल्लभ यांना ठार करून वल्लभच्या पत्नीसह दोन मुलींना गंभीर जखमी केले. घटनेनंतर जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वल्लभ यांना मृत घोषित केले. तर उर्वरित जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.
या प्रकरणी वल्लभ यांच्या पत्नी शीतल यांच्या बयाणावरून पोलीस स्टेशन देवळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पो. स्टे. देवळीचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जाधव यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणी एकूण २३ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी आरोपी कवडू याला भादंविच्या कलम ३०२ मुसार जन्मठेप व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांचा सश्रम कारावास, भादंविच्या कलम ३०७ अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा सश्रम कारावास, भादंविच्या कलम ४५९ अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा सश्रम कारावास, भादंविच्या कलम २०५१ नुसार पाच वर्षांचा कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयात शासकीय बाजू अँड. विनय आर. घुडे यांनी मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून समीर कडवे यांनी काम पाहिले.