

पवनार : परिसरात एक वर्षापूर्वी खुलेआम गावठी मोहाच्या दारूचे दुकान थाटण्यात येत होते. गल्लीबोळांपासून अगदी शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत हे अवैध धंदे बिनधास्त सुरू होते. परंतु, सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे यांनी कार्यभार स्वीकारताच, पवनार परिसरातील दारू विक्रेत्यांना लगाम घालण्याचा निर्धार केला. त्यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम उघडताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. नुकत्याच केलेल्या कारवाईत दारू विक्रीसह अन्य गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईने सात गुन्हेगारांना थेट जेलची हवा खावी लागत आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ निर्माण झाली असून पवनार येथे सेवाग्राम पोलिसांचा वचक निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळतात आहे.
ठाणेदार घागे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या धाडसत्रामुळे अनेक दारू विक्रेत्यांनी भीतीपोटी आपले व्यवसाय बंद केले. मात्र काही जण लपूनछपून हा व्यवसाय सुरू ठेवत होते. पोलिसांनी अशा विक्रेत्यांवर वारंवार छापे टाकले. गुन्हे दाखल होऊनही या आरोपींना न्यायालयातून सहज जामीन मिळत असे. मात्र यावेळी पोलिसांनी कायदेशीर बाजू मजबूत करत, दारूविक्रीसह इतर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरोधात कठोर कलमांखाली गुन्हे नोंदवले. त्यामुळे न्यायालयाने संदीप उर्फ नागो लाखे, अमित लाखे, नामदेव सांतघरे, मारुती कैकाडी, संजय कैकाडी, सतीश लाखे, अभिषेक पडघान या सात जणांना पोलिसांनी अटक केली, या सातही आरोपींना सेवाग्राम पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या मागील गुन्ह्यांची नोंद लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा जामीन न देता थेट न्यायालयीन कोठडीत पाठवले.
पवनारसारख्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या गावात पहिल्यांदाच अशा मोठ्या प्रमाणात एकत्रित कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी कारवाया झाल्या खऱ्या, पण आरोपी काही दिवसांतच जामिनावर सुटत असत. आणि पुन्हा आपले अवैध धंद्याच्या माध्यमातून गुन्हेगारीकडे वळत होते मात्र यावेळी पोलिसांच्या ठोस तयारीमुळे न्यायालयाने त्यांना थेट जेलची हवा दाखवली. या कारवाईमुळे पवनार परिसरात दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दारू विक्रेते आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थेट तुरुंगाची हवा खावी लागत असल्यामुळे आता अशा प्रकारच्या गुण्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेवाग्राम पोलिसांकडून होत असलेल्या या कारवाईचे पावनार येथील नागरिकांकडून स्वागत होत आहे.
प्रतिक्रिया…
दारू विक्रीचं वाढतं जाळं आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी ही केवळ कायद्याची नव्हे, तर समाजाच्या आरोग्याची समस्या आहे. आम्ही वारंवार चेतावणी दिली, पण काही जणांनी गुन्हेगारीचाच मार्ग निवडला. त्यामुळे कठोर कारवाईशिवाय पर्याय नव्हता. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना न्यायालयीन कोठडी मिळवून दिली आणि ही केवळ सुरुवात आहे. गावात शांतता प्रस्थापित होईपर्यंत पोलिसांचं धाडसत्र थांबणार नाही.
ठाणेदार विनीत घागे, पोलीस स्टेशन सेवाग्राम