हत्या करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा! जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

वर्धा : वाद सोडविण्याकरिता आलेल्या व्यक्तीवर चाकूने वार करून जीवानिशी संपविणार्‍या आरोपीस सात वर्षांचा सश्रम कारावास आणि एक हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश्-3 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम. मिश्रा यांनी हा निकाल दिला आहे.

सुरेश नवलसिंग सोळंकी (१९) रा. बदनापूर (मध्य प्रदेश), हल्ली मुक्काम निरंकार कोंटेज वर्धमनेरी, असे आरोपीचे नाव आहे. २९ मार्च २०१८ रोजी रात्री ९ वाजतादरम्यान निरंकारी कॉटेज, वर्धमनेरी शिवारात आरोपी सुरेश याने फिर्यादी साहिबा जानसिंग भिल्ल (अजनारे) यास ‘तू दोन दिवसापूर्वी रात्री प्राझ्या बहिणीच्या खोलीत का गेला?’ अशी विचारणा करून वाद घातला. तसेच आरोपीने चाकू काढून साहिबा यास जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात साहिबाचा चुलत भाऊ किसन भिल्ल वाद सोडविण्यास आला असता त्याच्या मांडीवर चाकूने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालय, आर्वी येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी साहिबा यांनी तळेगाव (श्या.पंत) पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड यांनी आरोपी सुरेश सोळंकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली तसेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, विशेष सरकारी वकील विनय घुडे यांनी शासनातर्फे ११ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. त्यानंतर शिक्षेच्या मुद्यावर अतिरिक्त सरकारी वकील प्रसाद सोईतकर यांनी युक्तिवाद केला, दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश-3 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम. मिश्रा यांनी आरोपीस सात वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपयाचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून आशिष चव्हाण यांनी कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here