तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; आर्थिक विवंचनेतून टोकाचा निर्णय?

पवनार : येथील रोशन वसंत सोनटक्के (वय २९) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील गोडाऊनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (25 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने पवनार परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सोमवारी संध्याकाळपर्यंत रोशन घरात न दिसल्याने त्याचे वडील वसंत सोनटक्के यांनी चौकशी सुरू केली. त्याचा मोबाईल फोन घरातच आढळून आला. दरम्यान भावाने घरभर शोध घेत वरच्या मजल्यावरील गोडाऊन उघडले असता रोशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना माहिती देण्यात आली. सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.

सोनटक्के कुटुंबाकडे एकत्रित दीड एकर शेती असून, याशिवाय बटाईवर आठ एकर शेती रोशन शेती करीत होता. या शेतीकामात त्याचे वडील व भाऊही मदत करीत असत. कुटुंबातील मुख्य जबाबदारी रोशनकडे होती. मात्र त्याच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पवनार शाखेचे सुमारे ₹63,000 कर्ज होते. त्याशिवाय बाहेरून उसनवारीवर घेतलेल्या लाखो रुपयांची देणी होती.

यंदाच्या मोसमात पिकांची स्थिती अपेक्षेप्रमाणे नाही. बटाईदाराचे भाडे व उसनवारीचे कर्ज कसे फेडावे, याबाबत तो सतत विवंचनेत होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यातूनच मानसिक तणाव वाढत गेला आणि अखेर त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोशन हा कुटुंबातील कर्ता पुरुष मानला जात असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंब आर्थिक व मानसिक धक्क्यात सापडले आहे. पवनार गावात या घटनेनंतर शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तरुण व कार्यक्षम शेतकरी अशा प्रकारे आत्महत्या करतो आहे, हे दुःखद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सेवाग्राम पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

शासनाच्या उपाययोजना प्रश्नचिन्हाखाली…

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन विविध योजना, कर्जमाफी, पीकविमा अशा योजना राबवित असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना वेळेत व आवश्यक तो दिलासा मिळत नाही. त्यामुळे आत्महत्या थांबविण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहते. या घटनेनंतर पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी, तत्काळ आर्थिक मदत व मानसिक आरोग्य समुपदेशनाची गरज अधोरेखित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here