पथदिव्याला दिली धडक! विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणारे वाहन दुभाजकावर; वाहनाचे स्टेअरिंग झाले अचानक लॉक

अल्लीपूर : विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचे अचानक स्टेअरिंग लॉक झाले. अशातच अनियंत्रित झालेले वाहन रस्ता दुभाजकावर चढत थेट पथदिव्यांच्या खांबावर धडकले. यात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असला तरी या घटनेमुळे अल्लीपुरात विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे उजेडात आले आहे. हा अपघात शुक्रवारी अल्लीपूर शिवारातील यशवंत शाळेजवळ सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास झाला.

कोविड संसर्ग नसल्यामुळे शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहेत. अशातच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यार्थी वाहतुकीसाठी कुठलाही परवाना नसलेले एक चारचाकी वाहन शाळकरी मुलांना शाळेत सोडून दिल्यानंतर परतीचा प्रवास करीत होते. भरधाव वाहन अल्लीपूर येथील यशवंत शाळेजवळ आले असता वाहनाचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले. दरम्यान, अनियंत्रित झालेले हे वाहन थेट रस्ता दुभाजकावर चढत पथदिव्यांच्या खांबावर धडकले.

या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून, पथदिव्याचे, तसेच अपघातग्रस्त वाहनाचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. अपघात होताच वाहन मालकाने तातडीने दुसरे वाहन बोलावून अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पसार केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना कुण्या राजकीय पुढाऱ्याचा आशीर्वाद तर नाही ना, अशी चर्चा परिसरात होत आहे. अल्लीपूर पोलिसांनी विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्याची गरज आहे.

विद्यार्थी थोडक्यात बचावले

जर अपघाताच्या वेळी वाहनात विद्यार्थी असते तर विद्यार्थी नक्कीच जखमी झाले असते अशी चर्चा घटनास्थळ होती. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी भरधाव वाहनात विद्यार्थी नसल्याने ते थोडक्यात बचावले. असे असले तरी या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here