प्रेमभंगानंतर युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न! वणा नदीत उडी घेताच वाचविले प्राण; उपजिल्हा रुगणालयात दाखल

हिंगणघाट : प्रेमभंगामुळे हतबल झालेल्या एका युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांकडून वेळीच योग्य कार्यवाही करण्यात आल्याने या युवतीचे प्राण वाचले आहे.

पोलीस सूत्रानुसार, हिंगणघाट शहरातील शास्त्री वॉर्ड भागातील रहिवासी असलेल्या या २० वर्षीय युवतीचे मागील चार वर्षापासुन चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकावर प्रेम होते. बुधवारी सकाळी त्या युवतीने युवकाला फोन करुन त्याला लग्नाची गळ घातली, त्यावर युवकाने लग्नास नकार दिल्याने युवती निराश झाली.

याच गोंधळलेल्या परिस्थितीत सकाळी १० च्या सुमारास या युवतीने कुटुंबीयांना न सांगता पांढरकवडा मार्गावरील वणा नदीचा पुल गाठला. शिवाय नदीत उडी घेतली. दरम्य़ान याच मार्गाने जाणाऱ्या काही व्यक्तींचे त्याकडे लक्ष गेल्याने त्यांनी आरडा- ओरड केली. शिवाय नदीत मासे पकडत असलेल्याचे लक्ष वेधले. त्यानंतर नदीच्या पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या या युवतीला वेळीच पाण्याबाहेर काढण्यात आल्याने तिचे प्राण वाचले. या युवतीला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. तेथून तिला वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here