शिधापत्रिका पडताळणीतील हमीपत्रावरून संभ्रम! ग्रामीण भागात रोष; शिधापत्रिका रद्द झाल्यास गरिबांचे काय?

चिकणी : गरिबांना दोन वेळचे जेवण मिळावे, याकरिता शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जातो. आता या शिधापत्रिकांची पडताळणी केली जात असून, याकरिता असलेल्या अर्जासोबत हमीपत्रही भरून घेतले जात आहे. त्या हपीपत्रामध्ये “आपल्याकडे गॅस कनेक्शन असल्यास शिधापत्रिका रद्द होईल’ असा उल्लेख असल्याने काहींनी याचाच ढिंडोरा पिटायला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातही बहुतांश नागरिकांकडे शिधापत्रिका आहेत तसेच गॅस कनेक्शनही अपवाद वगळता सर्वांकडेच उपलब्ध झाले आहे. काही बोगस लाभार्थीही शिधापत्रिकेच्या आधारे धान्याची उचल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाने शिधापत्रिका पडताळणी सुरु केली आहे. त्याकरिता शिधापत्रिकाधारकाला एक अर्ज भरून तो स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यायचा आहे. या अर्जामध्ये कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती विचारली आहे.

घरगुती गॅस जोडणीसंदर्भातही माहिती विचारली आहे. त्यामध्ये गॅस जोडणीधारकाचे नाव, ग्राहक क्रमांक, सिलिंडरची संख्या, गॅस कंपनीचे नाव आणि वितरकांचा पत्ता आदींचा समावेश आहे. यासोबतच एक हमीपत्रही दिले असून, त्यात ‘मी अर्जदार शपथेवर सांगतो की, माझ्या नावे तसेच माझ्या
कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली नाही. माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे. असा मजकूर असल्याने अनेकांनी याचा अपप्रचार चालविला. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातही रॉकेल मिळत नाही तसेच सरपणाचाही प्रश्न गंभीर आहे. शासनानेही योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन दिले. यामुळे बहुतांश शिधापत्रिका धारकांकडे गॅस जोडणी आहे. गॅस जोडणी असणाऱ्यांची शिधापत्रिका रदद झाल्यास सर्वसामान्यांच्या पोटचा घास हिरावण्याची भ्रीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, अर्जात विचारलेली माहिती भरल्यास हमीपत्र भरण्याची गरज नाही. कोणतीही माहिती लपविली जाऊ नये, याकरिता हे हमीपत्र असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here