ओबीसी आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार! फुले समता परिषद करणार आंदोलन

वर्धा : ओबीसींचे राजकीय आरक्षण घटनात्मक अटींच्या पूर्ततेअभावी स्थगित करण्यात आले आहे. आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार गुरूवार १७ जून रोजी सकाळी १२ वाजता वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहे.

याबाबत नुकतीच विश्राम भवनमध्ये सभा घेण्यात आली होती. त्यामध्ये समता परिषद, राष्ट्रवादी कॉंग्रेस व विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता व ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी निवेदने, धरणे आंदोलने, आक्रोश मोर्चे व निदर्शने टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच अनुषंगाने गुरूवारी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी सेल, विविध ओबीसी संघटना सहभागी होणार आहे.

तसेच ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्राप्रपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्यासह सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र यावे सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर ममे, लक्ष्मीनारायण सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, निळकंठ पिसे, विनय डहाके, विशाल हजारे, भरत चौधरी, निळकंठ राऊत, पुंडलिक नागतोडे, अल्का भूगुल, वनिता धामंदे, शारदा केणे, वीणा दाते यांच्यासह सबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here