अत्याचार झालेल्या पीडितेला भर चौकात उभे करून पोलिसांनी नोंदविली साक्ष; वर्ध्यातील प्रकार

वर्धा : विनयभंग, बलात्कार आदी गंभीर गुन्ह्यातील पीडितेची ओळख उघड होईल तसेच तिची समाजात बदनामी होईल असे कृत्य कुणीही करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, न्यायालयाच्या निर्देशांकडे खुद्द महिला पोलिसांनीच पाठ दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सेलू तालुक्यातील झडशी गावात उघडकीस आला आहे.

विनयभंग प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या महिला पोलिसांनी पीडितेला भर चौकात उभे ठेवत तिच्या समक्ष काही व्यक्तींची साक्ष नोंदविली. या घटनेमुळे झडशी परिसरात खळबळ उडाली आहे. झडशी नजीकच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना एका मुलाने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने ‘तू माझ्यावर प्रेम कर, नाहीतर मी माझ्या हातावर चिरेमारेल’ अशी धमकी दिली.

या प्रकरणी सेलू पोलिसात विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटून आला आहे. शुक्रवारी याच गुन्ह्याच्या तपासासाठी मुख्यालय असलेल्या वर्धा येथून दोन महिला अधिकारी झडशी येथे पोहोचल्या. त्यांनी पीडितेची बदनामी होईल असे कृत्य करीत तिला रस्त्यावर उभे ठेवून तिचे व काही साक्षदारांची साक्ष नोंदविली.

यावेळी या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत एक पुरुष कर्मचारी उपस्थित होता. पीडित मुलगी व तिची आई पोलिसांच्या गाडीमागे धावत असल्याचे विदारक चित्र येथे दिसून आले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे नागपंचमी निमित्त येथील प्राचिन नागमंदीरात दर्शनासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी या सर्व व्यक्तींनी उघड्या डोळयांनी हा गंभीर प्रकार पाहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here