पेट्रोलपंपाबाबत प्रशासनाकडून जनतेची दिशाभूल! पत्रकार परिषदेत कृती समितीचा आरोप

वर्धा : शहरातील पोलिस मुख्यालय येथे होत असलेल्या पेट्रोलपंपाला आमचा विरोध नसून त्या जागेला आहे. पेट्रोलपंप रद्द करावा, यासाठी आंदोलन केल्यानंतर पोलिसाकडून दुस-या जागेचा शोध सुरू असल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. मात्र बांधकाम सुरूच ठेवत संघटनांची दिशाभूल केल्याचा आरोप पेट्रोलपंप हटाव कृती समितीच्या वतीने करण्यात आला. शुक्रवारी शासकीय विश्रामग्रह येथे पत्रकार परिषदेत संवाद साधताना कृती समितीचे सदस्य बोलत होते.

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून नियोजीत पेट्रोलपंप बांधकामास परवानगी घेण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय, सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते सदर पेट्रोलपंपाचा विरोध करत जनसामान्यांची दिशाभूल करीत असल्याबाबत गुरुवारी पोलिस विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले होते. त्यानंतर आंबेडकरी संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

सदर पेट्रोलपंप नियमाला धरून नसल्याने त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी भीमनवार यांनी सुनावणी घ्यावी असे सांगितले होते. परंतु सुनावणीशिवाय आर्डर काढला कसा, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला. याठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून जवळच स्टेडियम आहे. विविध विभागाने दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र पोलिसांनी दबाव टाकून घेतले आहेत. 15 मीटर रुंद असणा-या रस्त्याची खोटी माहिती देऊन तो रोड मोठा असल्याचे सांगण्यात आले. असे करताना पोलिस प्रशासनाने दबाव टाकून नियमांना डावलून परवाना घेतल्याचा आरोप करण्यात आला.

पेट्रोलपंपासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पोलिसाकडून कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे. दादागिरी करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. 15 आँगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बजाज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पत्रकार परिषदेला समजाकल्याण सभापती विजय आगलावे, बसपाचे मोहन राईकवार, किशोर खैरकार, महेंद्र मुनेश्वर, अभय कुंभारे, विशाल मानकर, तुषार उमाळे, आशीष सोनटक्के, अतुल दिवे, विशाल रामटेके, स्मीता नगराळे, नीरज गुजर, शारदा झामरे, राजदिप नगराळे, जयबुद्ध लोहकरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, संभाजी ब्रिगेड, भिम आर्मी, भिम टायगर सेना, झळकारी सेना, निर्माण सोशल फोरम व संबुद्ध महिला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here