

आकोली : शेतशिवारातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीचा लोळ गोठ्यावर पडला. गोठ्याने लागलीच पेट घेतल्याने गोठा जळून राख झाला. या आगीमध्ये बांधून असलेली दोन वासरे जखमी झाल्याची घटना बोरखेडी शिवारात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
शेतकरी सतीश जमाने रा. बोरखेडी यांच्याकडे दोन एकर शेती आहे. त्या शेतामध्ये गायींचा गोठा असून गोठ्यावरुन विद्युत तारा गेल्या आहेत. बुधवारी सर्व गायी चरायला गेल्या असताना सायंकाळच्या सुमारास विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीचा लोळ गोठ्यावर पडला. गोठ्याने पेट घेतल्याने बघता-बघता गोठा जळून राख झाला. या आगीत दोन वारसे भाजली असून कुटार, चाऱ्यासह शेतीपयोगी साहित्य जळाले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत गोठ्याची आग विझविली. यात सतीश जमाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीतील पिकांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु केला. दूध विकून त्यापासून मिळणाऱ्या पैशावर घर चालतात. पण, आता गोठा जळाल्याने गायी बांधायच्या कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा पंचानामा करुन शासनाने मदत देण्याची मागणी जमाने यांनी केली आहे.