२.९१ लाखांचा दारुसाठा जप्त! कारचालकास ठोकल्या बेड्या; शहर पोलिसांची कारवाई

वर्धा : वर्ध्यात येणारा दारुसाठा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडला असून वाहनासह एकूण २ लाख ९१ हजार ४०० रुपयांचा विदेशी दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी कारचालकास अटक करण्यात आली. ही कारवाई शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने बोरगाव मेघे परिसरात २८ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केली.

सावंगी नजीकच्या सरदार बेड्यावरून वर्धा शहरात दारुसाठा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोरगाव मेघे परिसरात असलेल्या फार्मसी महाविद्यालयाजवळ नाकाबंदी केली असता एम.एच. ०४- एफ.झेड. ६९१६ क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता दारुसाठा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी चालक अक्षय रामेश्‍वर पोहाणे रा. धोत्रा याला अटक करून दारुसाठा जप्त केला, ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अहमद खान, सचिन इंगोले, नितीन रायलकर, अनुप राउत, दीपक जंगले, अमोल आत्राम, अविनाश निबाळकर, राजेंद्र ढगे, शिवदास डोईफोडे, राहूल भोयर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here