

वर्धा : नालवाडी परिसरातील आदर्श नगर, आशीर्वाद नगर, देशपांडे ले-आऊट, सु. राणा ले-आऊट येथील महिलांनी योग व व्यायामासाठी कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या परिसरातील महिलांनी अनेक वर्षांपासून नियमित योग वर्ग सुरू ठेवले आहेत. मात्र परिसरात विशेष योग व व्यायामासाठी सुविधा नसल्याने त्यांना संत बऱ्हाणंपुरे महाराज हॉलचा पर्यायी उपयोग करावा लागतो. त्या ठिकाणी लग्नसोहळे व इतर कार्यक्रमांमुळे वेळोवेळी अडचणी निर्माण होतात. पावसाळ्यात तर वर्ग घेणे अधिकच कठीण होते.
या पार्श्वभूमीवर महिलांनी परिसरात ओपन जिम आणि छतासह व्यायाम शेड उभारण्याची मागणी केली. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्वतः आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत महिलांची भेट घेतली व त्यांचे निवेदन स्वीकारले. मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. निवेदन देताना सौ. किरण गुल्हाने, रूपाली भोयर, लता येणोरकर, सुरेखा भोले, शुभांगी भोगे, बेबी नाज शेख, उषा इखार, अर्चना केवटे, सरला कीर्तने यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.