शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे कानाडोळा! रोहित्र जळाले; पिके ओलिताअभावी करपली: शेतकऱ्यांवर संकट ओढावले

वर्धा : आर्वी तालुक्यातील खरांगणा शिवारातील डहाके यांच्या शेतातील रोहित्र २० दिवसांपूर्वी जळाले, याबाबत ‘महावितरण’कडे शेतकऱ्यांनी तक्रारसुद्धा केली. मात्र, खरांगणा येथील वीज वितरणच्या कार्यालयाने दखल घेतली नाही. वीजपुरवठ्या अभावी ओलित करता न आल्याने उभी पिके धोक्यात आली असून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्‍यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून सोयाबीन, कपाशी व तूर पिकांची लागवड केली होती. मात्र, गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकण्यांची पंचाईत झाली आहे. शेतात असलेली पिके पाण्या अभावी करपण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

खरांगणा येथील महावितरण विभागांतर्गत खरांगणा शिवारातील डहाके यांच्या शेतातील रोहित्र २० दिवसांपूर्वी जळाले. या रोहित्रावर १५ ते २० शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीजोडणी आहे. याबाबत शेतकऱ्यांनी खरांगणा येथील महावितरण कार्यालयात जात तक्रार दाखल केली होती. मात्र, येथील अभियंत्यांनी शासनाच्या जीआरचा उल्लेख करून शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी आदेश दिले. त्यानंतरच रोहित्र सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

त्यानंतर काही शेतकऱ्यांनी थकीत असलेले वीज देयक भरले. मात्र, पैसे नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी देयक भरले नाही. याबाबत ५ जुलैला खरांगणा येथील महावितरण कार्यालयात काही शेतकऱ्यांनी वीज देयक भरले असल्याने रोहित्र सुरू करण्यासाठी अभियंत्यांना विनंती केली. मात्र, येथील उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी जोपर्यंत सर्व शेतकरी देयक भरणार नाही, तोपर्यंत रोहित्र सुरू होणार नाही, शासनाचे आदेश आहे, असे सांगून शेतकऱ्यांना परतवून लावले. २५-२० शेतकऱ्यांची जोडणी या रोहित्रावर असल्यामुळे पीके ऐन बहरात असताना शेतकऱ्यांवर हे संकट ओढावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here